जिल्हा परिषद शाळेस पुस्तके सुपुर्द करताना हरीश बर्गे. समवेत मान्यवर.
स्थैर्य, फलटण दि.९: मौजे काळज ता. फलटण येथील व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले युवक हरीश दिलीप बर्गे यांनी आपल्या विवाहाचा खर्च कमी करून त्या पैशांतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज येथील विद्यार्थ्यांसाठी आपल्या वडिलांच्या कै. दिलीप साहेबराव बर्गे स्मरणार्थ वाचनीय अशी 8 हजार रूपये किमतीची पुस्तके भेट दिली आहेत.
त्यांचा विवाह दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी असून त्यांनी विवाह अगदी साध्या पद्धतीने करण्याचे योजिले आहे. विवाहखर्चाला फाटा देवून खर्च वाचवून त्यातून या पुस्तक वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा काळज येथे करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी काळज गावचे माजी सरपंच नारायण घाडगे, गावचे पोलीस पाटील कैलास गाढवे तसेच सामाजिक कार्यकर्ते माऊली गाढवे आणि शाळेचे मुख्याध्यापक अरूण पवार आणि शिक्षक उपस्थित होते.
‘वाचाल तर वाचाल आणि टिकाल’ या उक्तीप्रमाणे हरीश बर्गे यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल शाळेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना वैवाहिक जीवनासाठी आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे नियोजन सचिन पंडित यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी साळुंखे यांनी केले तर आभार विकास बोंद्रे यांनी मानले.