कोळकीत पाण्यासाठी बोंबाबोंब

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटणचे उपनगर समजल्या जाणार्‍या कोळकी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची बोंबाबोंब झाल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. ज्या भागांमध्ये इमारती व बंगले उभे आहेत; अशाच भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अनेक नोकरदारांसह सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. ग्रामपंचायतीकडून गेले काही दिवस पाणीच आले नसल्याने संपूर्ण कोळकी गावातील सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी बोंबाबोंब करीत आहेत.

गेल्या काही वर्षांपूर्वी कोळकी गावामध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी भलामोठा प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पाद्वारे गेले काही वर्षांपासून कोळकीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. या करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्यामध्ये कोळकी मधील नागरिकांना पाणी पुरत होते; ग्रामपंचायतीकडून २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजनेचा शुभारंभ थाटामाटात करण्यात आला होता; परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा सुद्धा आजच्या घडीला होत नाही व कॅनॉलच्या पाण्याच्या रोटेशन प्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन ग्रामपंचायत करू शकत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजीचे स्वर उमटत आहेत.

फलटण तालुक्याचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून ‘कोळकी’ गावाची ओळख आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मतदान सुद्धा कोळकी गावातच आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोळकी ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू असते. यामध्ये कोळकी गावातील ग्रामस्थांना जर सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करीत आहेत.

कोळकी गावातील रहिवाशांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून कॅनॉल आटल्याने व त्यासोबतच पाणीपुरवठा साठवण तलावातील साठवण संपल्याने कोळकीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुका प्रशासन व जलसंपदा विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे; परंतु कॅनॉलचे रोटेशन वेळेत सुरू न झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी माहिती कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास नाळे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!