औरंगाबादेत निवडणुकांच्या तोंडावर ‘सुपर संभाजीनगर’चा बोर्ड, शिवसेना राजकारण करत असल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, औरंगाबाद, दि.२१: स्मार्ट सिटीच्या प्रचारात
संभाजीनगर नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा
वादाला सुरुवात झाली आहे. टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराज
पुतळ्याच्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला. यानंतर
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावरुन शिवसेनेवर निशाणा
साधला आहे. तसेच शिवसेना चीप राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

निवडणुकीच्या तारखा ठरल्या वाटतं…

‘औरंगाबाद
महापालिका निवडणुकांच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत असे वाटते. प्रत्येक
पाच वर्षांनी शिवसेना-भाजप हा मुद्दा वर काढते असते. म्हणजे कोणीही पाणी,
सांडपाणी, रस्ते, बागबगिचे, मोकळ्या जागा, रोजगार यासारख्या प्रश्नांवर
बोलू नये. टीव्ही सेंटर पोलिस चौकीच्या समोरचा हा बोर्ड लावल्याने आश्चर्य
वाटतेय’ असा टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियाच्या
माध्यमातून केली आहे.

राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करणे चुकीचे

पुढे
जलील म्हणाले की, ‘संभाजी महाराजांविषयी आमच्याही मनात खूप आदर आहे, मात्र
राजकीय फायद्यासाठी त्यांच्या नावाचा उपयोग करणे अत्यंत चुकीचे आहे. तीस
वर्षांपासून सत्तेत असूनही शिवसेना-भाजपने शहराची काय अवस्था केलेली आहे ते
पाहा. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या खांद्यामागे
लपण्याचा प्रयत्न ते करत आहेत’ असा आरोपही इम्तियाज जलील यांच्याकडून
करण्यात आला आहे.

अाैरंगाबाद मनपाच्या निवडणुका
पुढील दाेन- तीन महिन्यांत हाेण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर
सत्ताधारी पक्षांकडून विकासकामांचा जसा धडाका लावला जात अाहे तसा काही
संघटना व राजकीय पक्षांकडून मात्र ‘अाैरंगाबाद की संभाजीनगर’ असा जुनाच राग
अाळवला जाणार असल्याचे संकेत या ‘डिस्प्ले वाॅर’च्या माध्यमातून मिळत
अाहेत.

पाणीपुरवठा
याेजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी
विकासकामांचा धडाका लावण्याचे अाश्वासन देत ‘सुपर औरंगाबाद’ करण्याची घोषणा
केली. मात्र पालकमंत्र्यांच्या या घाेेषणेचा धागा पकडून मातृभूमी
प्रतिष्ठान या संस्थेने टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराज
पुतळ्याच्याजवळ ‘लव्ह अाैरंगाबाद’सारखाच ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा असाच
डिस्प्ले लावला. शिवसेना अामदार अंबादास दानवेंच्या हस्ते त्याचे लाेकार्पण
झाले. तिथेही सेल्फीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. असाच दुसरा
डिस्प्ले क्रांती चौकात लावला जाणार आहे.

मनपाने
सिडकाे एन-१ जवळील बसस्थानकाजवळील चाैकात ‘लव्ह अाैरंगाबाद’चे विद्युत
राेषणाई केलेले फलक झळकावले. पालकमंत्री सुभाष देसाई व इतर मान्यवरांच्या
उपस्थितीत त्याचे अनावरणही करण्यात अाले. सेल्फीप्रेमींचा त्याला चांगला
प्रतिसाद मिळत अाहे. औरंगाबादचे मूळ नाव खडकी असे होते. एेतिहासिक पैठण
जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर मानले जाते. या शहराला पूर्वी प्रतिष्ठाननगरी
नावाने ओळखले जायचे. हा इतिहास लाेकांना कळावा म्हणून हायकोर्टाच्या जवळ
ग्रीनबेल्टमध्ये ‘लव्ह प्रतिष्ठान’ नावाने तर खडकेश्वर महादेव मंदिराच्या
परिसरात ‘लव्ह खडकी’ या नावाने असेच डिस्प्ले लावण्यात आले आहेत. हे सर्व
पॉइंट सेल्फी पॉइंट म्हणून ओळखले जातात.

ऐतिहासिक
औरंगाबादच्या ब्रँडिंगसाठी मनपाने स्मार्ट सिटी योजनेतून शहरात ‘लव्ह
औरंगाबाद’चे फलक लावले, तिथे सेल्फी पाॅइंटही तयार केला. मात्र आता मनपा
निवडणुकांच्या तोंडावर स्मार्ट सिटीच्या योजनेस समांतर ‘सुपर संभाजीनगर’चे
फलक झळकावून कुरघोडीचे प्रकार सुरू आहेत. या माध्यमातून ‘औरंगाबाद विरुद्ध
संभाजीनगर’ अशी हवा तापवण्याचा प्रयत्नही सुरू झाल्याची चर्चा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!