दैनिक स्थैर्य | दि. २६ जानेवारी २०२४ | फलटण |
गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे येथील विक्रीकर विभागाचे उपायुक्त श्री. रघुवीर माने-पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.
याप्रसंगी ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, अकलूज प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे, प्राचार्य गिरीधर गावडे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत, ध्वजगीत व संविधानाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर सहावी ते नववीतील स्काऊट गाईड विभागातील विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी खडे व बैठे कवायत प्रकार सादर केले. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स, योगा डान्स व देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांची तयारी व सादरीकरण पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धा व इतर शैक्षणिक स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी श्री. रघुवीर माने-पाटील यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाळेचे प्राचार्य गिरीधर गावडे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळा राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शाळेने सुरू केलेल्या साधनाज् अकॅडमीच्या जेईई/ नीट/ आयआयटीच्या फाउंडेशन कोर्स व प्री फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यातील सर्व स्पर्धात्मक परीक्षेची तयारी निश्चितच चांगल्या प्रकारे करतील, असे नमूद केले.
प्रमुख अतिथी श्री. रघुवीर माने पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थी शिक्षक व व्यवस्थापनाचे कौतुक करून शाळेत एमपीएससी, यूपीएससी परीक्षा तयारीसाठी अभ्यासवर्ग चालू करणार असल्याचे जाहीर केले. शाळा व्यवस्थापनाने अभ्यास वर्गासाठी एक वर्गखोली देण्याचेही यावेळी मान्य केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य गिरीधर गावडे, उपप्राचार्य शीतल फडतरे, नृत्य शिक्षक तेजस फाळके, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन उपप्राचार्या शीतल फडतरे व उपशिक्षिका वर्षा दोषी यांनी केले तर आभार रमेश सस्ते सर यांनी मानले.