ओपन जीम उभारून नूतन मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली : सत्यजितसिंह पाटणकर


ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी सत्यजितसिंह पाटणकर व दिलीपराव पाटणकर, श्रीरंग कवडे, जगन्नाथ साळुंखे व मान्यवर.

स्थैर्य, पाटण, दि. 30 : नूतन तरुण मंडळाने कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून जमा झालेल्या लोकवर्गणीतून पाटणची ग्रामदैवता लक्ष्मी मंदिर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत ओपन जिम उभारणी केली आहे. या मंडळाने केलेले कार्य इतर मंडळांना आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन युवा नेते सत्यजजितसिंह पाटणकर यांनी केले.

पाटण येथील नूतन तरुण मंडळाच्यावतीने ग्रामदैवत लक्ष्मी देवी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर होते.

यावेळी पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, पाटण तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे, राष्ट्रवादी काँगे्रसचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी याज्ञसेन पाटणकर, दिलीपराव पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, गेल्या 54 वर्षांचा वारसा असणार्‍या या मंडळाने नेहमीच समाजाभिमुख होऊन गणेशोत्सव साजरा केला आहे, ही बाब प्रशंसनीय आहे. आज या मंडळाच्या तिसर्‍या पिढीतील कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीची जपलेली ही परंपरा या निमित्ताने दिसून येत आहे. यापुढेही गणेश मंडळाने सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेऊन इतरांना प्रेरणा द्यावी, असे सांगून युवकांनी या ओपन जिमचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी नूतन तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीपराव पाटणकर, श्रीरंग कवडे, बाळासाहेब जगताप, मूर्तिकार ज्ञानेश्‍वर कुंभार, जगन्नाथ साळुंखे, तसेच व्यायामशाळेला साहित्य पुरवणारे युवा उद्योजक बजरंग लोहार, सामाजिक कार्यकर्ते महादेव कुंभार यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संजय इंगवले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

कार्यक्रमास दीपकसिंह पाटणकर, नगरसेवक अजय कवडे, किरण पवार, माजी सरपंच चंद्रकांत मोरे, मुख्याध्यापक विलास पवार, शिवाजीराव जगताप, यशवंतराव जगताप, सुरेश झगडे, साहेबराव पाटणकर, श्रीकांत फुटाणे, दिनेश माने, काशिनाथ विभूते, रवींद्र शेडगे, अनिल थोरात, जगन्नाथ राऊत, सदाशिव कवडे, गणपतराव लोहार, राजेंद्र राऊत, तात्या लोहार, राजेंद्र सुतार, विठ्ठल महाडिक, चेतन पवार, बी. एन. पाटील यांच्यासह पाटणमधील नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!