स्थैर्य, सातारा, दि. २०: कराड तालुक्यातील तळबीड येथील एका हॉटेल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याची अवैध वाहतूक करणार्या दोनजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 लाख 37 हजारांचा गुटखा व एक कार असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी, तडबीड येथील उमा महेश हॉटेल व लॉजिंग येथे मोकळया जागेत एक पांढर्या रंगाची फोक्सव्हॅगन कंपनीची पोलो कार (एमएच 12 जीसी 506) रोडच्या कडेला संशयितरित्या उभी होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पेट्रोलिंग करत असलेल्या पथकाला कार दिसताच त्यांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता कारमध्ये दोन इसम आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यावेळी कारमध्ये पांढर्या रंगाची पोती दिसून आली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा, सुगंधी पान मसाला असा एकुण 3 लाख 37 हजार 990 रुपयांचा माल आढळून आला. पोलसांनी दोघांनाही ताब्यात घेवून गुटखा व कार असा मुद्देमाल हस्तगत केला. दोघा संशयीतांना आणि मुद्देमाल पुढील कारवाई कामी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सातारा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस अंमलदार ज्योतीराम बर्गे, अतिष घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, संजय जाधव, पंकज बेसके यांनी केली.