दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । बागलकोट । दक्षिणद्वार कर्नाटकातील सत्ता राखण्यासाठी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ६५ सभा रोड शोचे आयोजन एप्रिल अखेरपासून प्रचार संपेपर्यंत करण्यात आले आहे.
कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. ‘डबल इंजिन सरकार’चा मुद्दा उचलण्यासाठी मोदी, शाहांना, तर हिंदू मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी योगींचा उपयोग केला जात आहे.
४० हेलिकॉप्टर, २० चार्टर विमाने
मोदींच्या नावावर मते मागण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मोदी आणि शाहांच्या प्रत्येकी २५, तर योगींच्या १५ सभा होत आहेत.
शाहांनी दक्षिण कर्नाटक, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटकचे दौरे करताना बसव कल्याणला दोनदा भेट देऊन लिंगायत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला. ४० हेलिकॉप्टर आणि २० चार्टर विमाने भाजपच्या नेत्यांसाठी तैनात करण्यात आली आहेत. भाजप ‘डबल इंजिन सरकार’च्या फायद्यांचा पुनरुच्चार करत आहे. आता काँग्रेसने ‘डबल इंजिन नव्हे, हे तर ट्रबल इंजिन सरकार’, अशा जाहिरातींनी धुरळा उडवून दिला आहे.