मध्य प्रदेशात भाजपाला जबर धक्का, गंभीर आरोप करत बड्या नेत्याने सोडली साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । मुंबई । भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र दीपक जोशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, ते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही काळातील घडामोडींमुळे माझ्या वडिलांच्या अस्मितेला धक्का बसला आहे. मी आता त्यांचं स्वप्न काँग्रेसमध्ये जाऊन पूर्ण करेन. माझ्या वडिलांनी सुचितेचं राजकारण केलं. मात्र आता भाजपाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. बागलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे मला वाईट वाटले आहे. मी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. भाजपाच्या सर्व नेत्यांसोबत माझी चर्चा झाली आहे. मात्र मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी अखेपर्यंत लढत राहीन, असे दीपक जोशी यांनी सांगितले.

माजी मंत्री असलेल्या दीपक जोशी यांनी ५ मे रोजी देवास येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, निश्चित वेळेनुसार मी माझ्या वडिलांची तसबीर घेऊन भोपाळला जाईन. माझा वारसा माझ्या हातात आहे. माझी चौथी-पाचवी पिढी भाजपासोबत काम करत आहे. भाजपाला माझ्या निर्णयामुळे वाईट वाटेल. मात्र कुटुंबाला वाचवण्यासाठी  मी ही लढाई लढत आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. मात्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सांगतात की खा आणि खाऊ द्या. हा फरक त्रासदायक आहे. माझ्या वडिलांबाबत पक्षाचं वर्तन योग्य नाही आहे. त्यांचं स्मारक बनू दिलं गेलं नाही. ही बाब माझ्यासाठी दु:खदायक आहे. जेव्हा जबाबदारी सातत्याने दाखवूनही परिणाम झाला नाही. तेव्हा मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!