स्थैर्य, कऱ्हाड, दि. 23 : कोरोना महामारीच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत कऱ्हाडात भाजपने ठाकरे सरकारचा निषेध केला. मेरा आंगण मेरा रणांगण या भाजपने दिलेल्या नाऱ्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ मे रोजी मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याला अनुसरून शहरातील कार्यकर्त्यांनी आपापल्या घरासमोर हे आंदोलन सामाजिक अंतराचे भान ठेवून केले. यावेळी काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रेबीन, काळे मास्क, काळे शर्ट याचा आवर्जून उपयोग केल्याचे पाहायला मिळाले.
भाजपचे प्रवक्ते, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी कुटुंबीयांसमवेत कऱ्हाड येथील राहत्या घरासमोर निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
पंढरपूर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मलकापूर येथे निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांच्या हातात सरकारच्या निषेधाचे फलक होते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सोमवार पेठेत घरासमोर हे आंदोलन केले.
महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव ठाकरे मात्र स्वत:च्या घरात, उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार अशा आशयाच्या निषेधाचे फलक भाजप कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते. तर काळे कपडे, काळे मास्क, काळे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना नियंत्रणात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. गरीब, गरजू, लोकांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना यांना पिणाऱ्यांचा प्रश्न पडला असून, घरपोच दारू देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. म्हणूनच गांभीर्याची जाण नसणाऱ्या या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.
– शेखर चरेगावकर