स्थैर्य, मुंबई, दि.२२ : नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार
बाळासाहेब सानप यांनी मनगटावरील ‘शिवबंधन’ तोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
मात्र, त्यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप
पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय
राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार
आहेत.
मुंबईतील शिवसेना भवनात आज दुपारी तीन वाजता भाजप पदाधिका-याचा शिवसेना प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं
बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. बाळासाहेब सानप
यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत
निवडणुकीच्या निमित्तानं सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समजतं.
बाळासाहेब सानप हे नाशिक पालिकेत महापौर
राहिले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा लढवली होती. त्यानंतर
सानप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2019 ची
निवडणूक सानप यांनी लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विधानसभेत पराभव झाल्यामुळे सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता
शिवसेनेला रामराम ठोकून सानप पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहे.
दुसरीकडे मात्र, सानप यांच्या घरवापसीमुळे
नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले
आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत
यांच्या उपस्थितीत ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.