दैनिक स्थैर्य | दि. ८ मे २०२३ | फलटण |
बिजवडी, ता. माण येथे गेल्या दहा वर्षांपासून बंद पडलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महिलांच्या पुढाकाराने पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली. यावेळी महिलांनी सर्व महामानवांच्या प्रतिमा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीला भेट दिल्या. प्रचलित परंपरेला फाटा देत यावेळी ‘ना डीजे, न फटाक्यांची आतिषबाजी’ करत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धांच्या धम्माच्या विचाराचे मंथन करण्याच्या दृष्टीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी धम्माचा विचार मांडण्यासाठी दहिवडी कॉलेज दहिवडीच्या प्रा.मिरा देठे तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य व त्यांची चळवळ’ या विषयावर मांडणी करण्यासाठी प्रगत शिक्षण संस्थेचे प्रकल्प अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना प्रा. मीरा देठे मॅडम म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘बौद्ध धम्म’ हा विज्ञानवादी धम्म असून तो आचरणावर आधारित आहे. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन शरणाला शरण जावून तथागत भगवान बुद्धांनी दिलेला न्याय, नीती व विज्ञानवादी विचारांवर आधारित आपले आचरण असावे.
यावेळी सोमीनाथ घोरपडे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही व्यक्ती नसून तो एक विचार आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड परिश्रम घेऊन केलेल्या तीनही प्रतिज्ञा पूर्ण केल्या. त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धांचा विचार या भूमीमध्ये रुजविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिले आहे. तेव्हा आपणही उच्च शिक्षण घेऊन महत्त्वाच्या जागा पटकाविण्यावर लक्ष ठेवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्वच महामानवांनी व महामातांनी आपल्याला आदर्श जीवन जगण्याचा विचार दिला आहे. त्याचा अंगीकार करण्याचा संकल्प आजच्या दिनी केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जगातील नामांकित अशा शिक्षण संस्थांमधून, विद्यापीठांमधून ३२ पदव्या मिळवल्या. आपणही त्यांचाच आदर्श घेऊन उच्च शिक्षण मिळवले पाहिजे, तर आणि तरच आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी पुढे घेऊन जाऊ शकू.
यावेळी मुख्य मान्यवरांसह सर्वच मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांपासून ते सर्वच महामानवांच्या व महामातांच्या पुस्तकाची सस्नेह भेट देण्यात आली. अतिशय शांततामय व नियोजनबध्द पद्धतीने जयंती महोत्सव संपन्न झाला.
यावेळी रात्री हिंगणे येथील भीम बुद्ध गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच अबाल वृद्धांनी मेहनत घेतली. शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप शंकर भोसले यांनी सर्वांना पुस्तकाचे दान दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष युवराज भोसले, शिवसेनेचे संजय भोसले, ग्राम विस्तार अधिकारी महादेव भोसले, ग्रामसेवक बापूराव सरतापे, बोरो इंडिया संस्थेचे संतोष रणदिवे, माजी सैनिक भारत रणदिवे, बाबासाहेब भोसले, दादा यशवंत भोसले यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.