आळजापूरच्या केंजळे वस्तीत वीज पडून गाय ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ मे २०२३ | फलटण |
फलटण शहर व परिसरात काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पडलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी रस्त्यांवर वृक्षांच्या फांद्या पडल्या तर आळजापूरच्या केंजळे वस्ती येथील विठ्ठल जाधव यांची जर्सी गाय वीज पडल्याने ठार झाली.

गेल्या काही दिवसांपासून फलटण परिसरात उन्हाची तीव्रता सतत कमी-जास्त होत होती. तालुक्यात सर्वत्र प्रचंड उकाडा वाढला असताना काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळ वार्‍यासह प्रचंड पाऊस झाला. या पावसाने हवेत गारवा निर्माण केला असला तरी मालमत्तेचे नुकसानही केले आहे.

रविवारी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान अचानक आभाळ भरून आले. मोठ्या प्रमाणावर वारा सुरू झाल्याने काही ठिकाणी झाडांच्या फाद्या पडल्या तर विजांचा कडकडाट सुरू झाला. केंजळे वस्ती, आळजापूर येथे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली. त्यामध्ये विठ्ठल जाधव यांची सुमारे ४५ ते ५० हजार रुपये किमतीची जर्सी गाय दगावली आहे.

या घटनेची सरपंच शुभम नलवडे, माजी सरपंच दिलीप नलवडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पवार आदींनी केंजळे वस्ती येथे जाऊन पाहणी केली व विठ्ठल जाधव यांना दिलासा दिला. दरम्यान, गावकामगार तलाठी हुलहुले, पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. नेवसे यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली आहे. सकाळी शवविच्छेदन करून घटनेचा अहवाल तहसीलदार यांना सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा सरपंच शुभम नलवडे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आसू, गोखळी, दुधेबावी, गिरवी, पाडेगाव, आदर्की, बिबी, सासवड वगैरे परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. सध्या शेतात भाजीपाला, मका, कडवळ ही चारा पिके आणि मोठ्या प्रमाणावर असून ऊस उभा आहे. या पावसाने यापैकी कोणत्याही पिकाचे नुकसान होणार नाही, मात्र, भाजीपाल्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस ऊस व डाळिंब बागांना फायदेशीर ठरेल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.


Back to top button
Don`t copy text!