मोठ्या मनाचा मोठा अधिकारी : आयपीएस धनंजय घनवट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

व्यवसाय, नोकरी अशा अनेक कारणांनी गावाकडची मंडळी पुणे, मुंबई अशा ठिकाणी अथवा परराज्यात काही ना काही कारणाने वास्तव्यास जातात; परंतु गावाकडची माणसे जर भेटली तर त्यांना नक्कीच आनंद मिळतो आणि किती पाहुणचार करू, असे होऊन जाते. याचीच प्रचिती आसाम राज्याची राजधानी असलेल्या गुवाहाटी येथे स्थित असलेल्या आसाम पोलीसचे डीआयजी आयपीएस धनंजय घनवट यांना भेटल्यावर आली. खरंच ही भेट ग्रेट ठरली.

धनंजय घनवट हे फलटण तालुक्यातील कुरवली (माळवाडी) येथील मूळचे रहिवाशी आहेत. श्रीहरी टूर्सतर्फे ‘आसाम टूर’चे नियोजन झाले आणि हिम्मतराव घनवट, सुनील गरुड रावसाहेब, दशरथ फुले यांच्या माध्यमातून अगोदरच संपर्क केला असल्याने साहेबांनी आपल्या व्यस्त वेळेतूनही भेट घायचे नक्की केले; परंतु टूर प्रोग्रॅम नुसार ही भेट पहिल्या दिवशी होऊ शकली नाही. सर्व प्रोग्रॅम पूर्ण करून शेवटच्या दिवशी ही अविस्मरणीय भेट झाली.

आसामसारख्या दुर्गम भागात टूर करणे तसे अवघड काम आहे; परंतु सद्गुरू हरीबाबांच्या कृपेने सहजसोपे होऊन गेले; परंतु शेवटच्या दिवशी मात्र रेल्वे १८ ते १९ तास उशिरा आल्याने नियोजनात बदल करावा लागला. संकट मोठे होते; परंतु इतक्या लांब आसाममध्ये आपला माणूस मोठ्या पदावर आहे, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एवढा मोठा आधार वाटला आणि घनवट साहेबांनी तो आधार सार्थ केला.

त्यांना फोन करून सांगितले की, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी तत्परतेने सांगितले की, कोणतीही काळजी करू नका. इतक्यावरच न थांबता त्यांनी त्या रात्रीची स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली आणि स्वतः रात्री १० ते ११.३० पर्यंत हॉटेलवर येऊन विचारपूस केली. त्यांचे झालेले शिक्षण, त्यांची असणारी आवड व कौटुंबिक माहिती दिली व सर्व सहभागी प्रवाशांचीही माहिती जाणून घेतली. मनसोक्त अशा गप्पागोष्टी केल्या. यावरून त्यांच्या मनाचा मोठेपणा व आपल्या माणसाबद्दलची आस्था जाणवल्याशिवाय राहिली नाही.

एवढेच करून ते थांबले नाहीत तर विमानाने जाणार्‍या एका ग्रुपची दुसर्‍या हॉटेलवर व्यवस्था केली होती. त्यांची भेट घेण्यासाठीही ते आतुर होते. दुसर्‍या दिवशीही वेळ काढून त्यांना घनवट साहेबांनी घरी आमंत्रित केले व कुटुंबियांसह त्यांचाही पाहुणचार व आदरतीथ्य केले.

आम्ही सर्वजण त्यांच्या या मोठेपणाने नक्कीच भारावून गेलो. जशी ‘आसाम टूर’ अविस्मरणीय झाली, तशी धनंजय घनवट साहेबांची ही भेट ग्रेट, अविस्मरणीय अशीच झाली. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे शतशः आभारी आहोत.

– सुभाष भांबुरे, श्रीहरी टूर्स,
संपादक, श्रीहरी सुभाषित,
फलटण, जि. सातारा.


Back to top button
Don`t copy text!