स्थैर्य,मुंबई,दि ११: महिला दिना दिवशीच स्त्री शक्तीचा अपमान करून त्यांना अमानवी वागणूक देणारे काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुडा यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी गुरूवारी केली. महिला आयोगाने हुडा यांच्यावर कडक कारवाई करावी असेही श्रीमती खापरे यांनी एका प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनामध्ये महिला दिनाच्या दिवशी भुपेंद्र सिंह हुडा यांनी स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून तो ट्रॅक्टर महिलांना ओढायला लावला होता. भुपेंद्र सिंह हुडा यांच्या या अमानवी कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी देशभर आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड येथे आंदोलन करण्यात आले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद सह राज्यभरात ही आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली मोकाक्षी, उपाध्यक्ष रिधा रशिद, पुनम उपाध्याय, सचिव रिटा मकवाना, मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष शितल गंभीर, उपाध्यक्षा शलाका साळवी, जिल्हाध्यक्षा रचना शिरसाट यांनी सहभाग घेऊन या कृत्याचा निषेध नोंदवला.
श्रीमती उमा खापरे म्हणाल्या की, भुपेंद्र सिंह हुडा यांनी महिलांना ट्रॅक्टर ओढायला लावणे हे कृत्य अमानवी आणि स्त्री शक्तीचा अपमान करणारे आहे. महिला दिनी आंदोलनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा गैरवापर करणारे त्यांचे हे कृत्यच मुळात लज्जास्पद आहे. भुपेंद्र सिंह हुडा यांनी तात्काळ महिलांची माफी मागावी व महिला आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत असताना एका ज्येष्ठ नेत्यांच्या अशा वर्तणुकीवर काँग्रेस नेत्या गप्प कशा बसू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.