जिल्ह्यातील विविध पांदणरस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


स्थैर्य, अमरावती, दि.२०: शेतकरी बांधवांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी व आवश्यक कृषी निविष्ठांच्या वाहतुकीसाठी चांगले रस्ते असावेत यासाठी जिल्ह्यात पांदणरस्त्याचे विशेष मॉडेल राबविण्यात येईल, असे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पांदणरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. गावातील अनेक मान्यवर व कृषी, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चांगले पांदणरस्ते नसले तर शेतकरी बांधवांना शेतापर्यंत पोहोचण्यास त्रास होतो. पावसाळ्यात तर हा त्रास आणखीच वाढतो. शिवाय, निविष्ठा पोहोचविण्यासाठीही अडथळे येतात. हे लक्षात घेऊन पांदणरस्ते योजनेचे अमरावती जिल्ह्यासाठी विशेष मॉडेल अंमलात आणण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी कन्व्हर्जनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन, मनरेगा, जिल्हा परिषद, आमदार निधीतूनही अधिकाधिक कामे राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

कठोरा येथे कठोरा-नवसारी पांदणरस्ता, कठोरा ते श्री. दहिकर यांच्या शेतापर्यंत पांदणरस्ता, कठोरा ते टाकळी ई-क्लास चांदूर बाजार शिवरस्ता कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या करण्यात आले. सालोरा येथील सालोरा बु. ते आमला शिवपांधण रस्ता, सालोरा बु. ते पेढी नदीपासून राजगौरीधर यांच्या शेतापर्यंत पांदणरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. पुसदा येथील पुसदा ते शिवपांधण रस्ता, पुसदा ते जऊळका पांदणरस्ता, पुसदा ते भूगाव पांदणरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. नांदुरा लष्करपूर येथील चोपण नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण आणि नांदुरा लष्करपूर ते सरमस्ताबाद पांदणरस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

डोह खोलीकरणाला चालना

गोपाळपूर येथील पेढी नदीच्या डोहाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यामुळे पाणीसाठ्यात सुधारणा होऊन परिसरात भूजलसंवर्धनासही मदत होणार आहे. गोपाळपूर-आमला पांदणरस्ता, गोपाळपूर-पेढी नदी ते महाजनवाडी पांदणरस्ता, गोपाळपूर पिंप्री ते पेढी नदीपर्यंत पांदणरस्ता, गोपाळपूर ते हिरापूर पांदणरस्त्याचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!