फलटणमध्ये तुतारी विरुद्ध कमळ थेट लढतीची शक्यता!

श्रीमंत रामराजे तुतारीच्या वाटेवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासमोर त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाऊन तुतारी हाती घ्यावी अशी एक मुखी मागणी केली आहे. त्यावर श्रीमंत रामराजे यांनी येणाऱ्या दोन-चार दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून अजितदादांना सर्व बाबी निदर्शनास आणून देत मग आपण तुतारी हातात घेऊ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत होण्याची स्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गत काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती. महायुतीमध्ये असून सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्पष्ट सांगितले होते की; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणे आम्हाला जमणार नाही. त्यामुळे त्यांनी सक्रिय प्रचारात सहभाग न घेता सर्व निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवले व लोकसभा निवडणुकीमध्ये राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार केलेला बघायला मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या महायुतीत मोठ्या प्रमाणावर धुसपुस बघायला मिळत होती.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणूक ही पूर्ण ताकतीने लढवून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार रिंगणात असेल व तोच निवडून सुद्धा जाईल असा विश्वास अनेक वेळा पत्रकार परिषद व जाहीर कार्यक्रमांमध्ये सुद्धा व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना १८ हजारांच्या आसपास मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राज्यामध्ये असणारी महायुती ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये टिकणार नव्हती हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना थेट जाहीर केल्यामुळे श्रीमंत रामराजे हे महायुतीमध्येच राहणार अशा चर्चा सुरू होत्या. परंतु काल झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनेनुसार श्रीमंत रामराजे हे अजितदादांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

श्रीमंत रामराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा थेट सामना होईल अर्थातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आता थेट फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगणार आहे.

आता येणाऱ्या काळामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार याकडे आता मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!