दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय पर्व अंतर्गत दि. 13 एप्रिल 2023 रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमांचे उद्घाटन स्वाती इथापे, उपआयुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थितांना आ. ह. साळुंखे लिखित डॉ. आंबेडकरांची शेती नि जलनीती हे पुस्तक भेट देण्यात आले. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, मार्फत जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा वेळी प्रतापसिंह हायस्कूल येथे आयोजित रांगोळी स्पर्धा व शाहू कला मंदीर येथे आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये शहर व परिसरातील सर्व लहान, थोर नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रम स्थळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत पोस्टर्सचे सातारा नगरवाचनलय मार्फत ग्रंथ प्रदर्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेसोबत सेल्फी पॉईंट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र व त्यांचे विचार यावर आपले विचार व्यक्त करा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दुपारी 12 ते 3.30 या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत डॉ. जब्बार पटेल निर्मित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा चित्रपट सर्व नागरिकांना पाहण्यास खुला ठेवण्यात आला. तद्नंतर भारताच्या संविधानाचे सामूहिक वाचन करुन कार्यक्रम संपन्न झाला.