सर्व ग्रह सर्वोच्च स्थानात असताना चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी माता प्रिशला व पिता सिध्दार्थ सह सर्व जगताला सुखद करणारी महत्त्वाची घटिका आली. जगाला अहिंसेच्या परममंत्राचा उपदेश देण्यासाठी भगवान महावीरांचा जन्म झाला. भगवान वर्धमान महावीर हे चोवीसावे तीर्थंकर असले तरी ते अवतार किंवा प्रेषित नव्हते. कारण प्रत्येक आत्म्यात तीर्थंकर किंवा महामानव बनण्याची क्षमता ही असतेच, ही शिकवण जैन धर्माने सुरुवातीपासूनच दिली आहे.
आज संपूर्ण देशात नव्हे, तर देशाबाहेरदेखील आपण भगवान वर्धमान महावीरांचा जन्म-कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करीत आहोत. कारण ‘जन्मकल्याणक’ हे आत्म्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे असतात.
भगवान महावीरांच्या जन्मकल्याणकाच्या दिवशी अहिंसा रॅली काढणे, महावीरांच्या तत्त्वांची घोषवाक्ये बनविणे, मिरवणुका काढणे अशा एक ना अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, पण या सर्व गोष्टी त्या दिवसापर्यंतच सीमित का असतात? याप्रकारे भगवान महावीर जयंती साजरी करणे कितपत सार्थक आहे?
आपला जैन समाज हा भारत देशामध्ये अहिंसावादी, शांतताप्रिय व हितोपदेशी म्हणून ओळखला जातो. जैन समाजातील प्रत्येक व्यक्तीवर भगवान महावीरांच्या तत्त्वांचा प्रभाव आहे. आपला भारत देश आज विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला भगवान महावीरांची तत्त्वे व्यवस्थित उमजली तर या भारत देशाची ही विकसित वाटचाल अशीच उत्तुंग चालू राहील. यासाठी गरज आहे ती भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची. आवश्यकता आहे ती त्यांच्या तत्त्वांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनाशी घालण्याची. जेणेकरून आपला देश सुद़ृढ, स्वावलंबी होईल.
भगवान महावीरांचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे तत्त्व म्हणजे अहिंसा, अर्थात ‘जगा आणि जगू द्या’. प्रत्येक माणसाने जरी या तत्त्वांचा सारासार विचार केला तर हे राष्ट्र खून, मारामारी, अभक्ष्य वृत्ती यांमधून मुक्त होईल व एक शांततामय वातावरण या देशात प्रस्थापित होईल. देशादेशात होणारे संघर्ष, देशांतर्गत होणारे जातीभेद, विविध धर्मांमधील वाद हे सर्व ‘परस्परग्रहो जीवनास्’ या युक्तीवादाने संपुष्टात येतील.
भारतासारख्या मोठ्या व सर्वात जास्त लोकसंख्या असूनही विविधतेत एकता असलेल्या देशाला आज भ्रष्टाचारासारख्या वाळवीने पूर्णपणे पोखरून टाकले आहे. हा भ्रष्टाचार मुळासकट काढायचा म्हटला तर प्रत्येकाने राजा हरिश्चंद्र व प्रभू रामचंद्रांचे सत्यवचनी गुण अंगिकारले पाहिजे. एकमेकांवर विश्वास ठेवून फसवणूक थांबवायला हवी. सत्याची बाजू ही नेहमीच असत्यापेक्षा जड असते. यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम नि:स्वार्थीपणाने केले पाहिजे, तरंच प्रत्येक मनुष्य सुखी, समाधानी जीवन जगू शकेल.
‘अचौर्य’ म्हणजे चुकीच्या मार्गाने पैसा किंवा कुठलीही गोष्ट हस्तगत करणे, मग ती मौल्यवान असो वा नसो, या सर्व प्रकारात इतरांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास व फसवणूक ही हिंसाच नाही का? चोरी ही पैशांची असो, धर्माची असो वा साधनसंपत्तीची, या सर्वांतून अघटितंच घडते. जे सर्वांसाठीच हानिकारक आहे.
‘अपरिग्रह’ म्हणजे मानवी जीवनाला आवश्यक तेवढीच संपत्ती वापरात घेणे व अतिरिक्त संपत्तीचा वापर गोरगरीबांच्या शिक्षणासाठी, अपंगांच्या – अनाथांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच गरजू व्यक्तींच्या सेवेत अर्पण करावी. ही एक अपूर्व अशी कल्पना असून संपूर्ण मानवजातीच्या हिताची आहे, मानसिक समाधानाची आहे.
या भगवान महावीरांच्या तत्त्वांच्या अवलंबनाने संपूर्ण विश्वास समानता प्रस्थापित होऊन गरीबी नष्ट होण्यास मदत मिळेल. हव्यासी वृत्तीमुळे निष्कारण संग्रहित होणारी संपत्ती ही सर्व दु:खांचे व संघर्षाचे मूळ कारण होऊ शकते.
‘अनेकांतवाद’ म्हणजे आपल्या विचारांचा एकांगी आग्रह न करता परमताचा देखील विचार करणे, कारण कुठल्याही नाण्याला दोन बाजू या असतातच व त्यामुळेच कित्येक संघर्ष हे विकोपाला न जाता सहज व सोप्या मार्गाने सोडविता येतात.
भगवान महावीरांनी संबोधलेल्या या तत्त्वांचा प्रत्येकाने अंगिकार करावा जेणेकरून राष्ट्रा-राष्ट्रांमधील मतभेद, जातीभेद, उच्चनीच भेदभाव नष्ट होतील. सत्य, संयम, तप, अहिंसा, क्षमा या गुणांवर आधारीत हा धर्मसंघ संख्येपेक्षा गुणात्मकतेला अधिक प्राधान्य देत राहिला.
अशा या लोकाभिमुख आणि लोकहितकारी विचारधारेच्या आचरणाची समाजास आज नितांत गरज आहे.
| जय जिनेन्द्र |
- दिशा प्रितम शहा (वडूजकर)