दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२३ । बारामती । महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मधील टक्का अगदीच कमी आहे. त्यामुळेच पुण्यात एनडीए आहे, पण एनडीएमध्ये महाराष्ट्र राज्य नाही, असे म्हटले जायचे. मात्र, मूळची बारामती ची लेक असणारी जुई ढगे हिने या गोष्टी खोट्या ठरवत एनडीएमध्ये दिमाखात प्रवेश मिळविला. लाखो मुलींना मागे सारत तिने देशात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला, तर मुला-मुलींमध्येही ३१ वा क्रमांक पटकावीत बारामती च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी (एनडीए) म्हणजे अवघ्या वयाच्या बावीसाव्या वर्षीच भारतीय सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा राजमार्ग आहे. धनुर्विद्येत सुद्धा राष्ट्रीय यश जुईने मिळवलेले आहे . जुईही आंबेगावातील इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये असताना तिच्या आईने तिला धनुर्विद्या शिकविण्याचा क्लास लावला. सकाळी ८ ते २ शाळा आणि दुपारी ४ ते ७ आर्चेरीचा क्लास अशी तिची सुरुवात झाली. जसजशी जुईने धनुर्विद्या स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरु केली तसतशी तिची प्रैक्टिस वाढत गेली. त्यानंतर पहाटे पाच वाजता उठणे, साडेसहापर्यंत व्यायाम आणि धनुर्विद्याची प्रैक्टिस, त्यानंतर शाळा. घरी आल्यावर दुपारी पुन्हा धनुर्विद्याचा सराव असे वेळापत्रक तिचे रुटीन झाले. दहावी आणि बारावी परीक्षेत जुईने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आणि नुकतेच तिने व्हीआयआयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता.
अधिकारी होण्याचा महामार्ग याच एनडीएने देशाला अनेक सैन्यप्रमुख दिले. त्यामुळे एनडीएमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी देशातील लाखो विद्यार्थी दरवर्षी प्रयत्न करतात. मात्र, मुलींना त्यामध्ये प्रवेश नव्हता. गेल्या दोन वर्षांपूर्वी मुलींनाही एनडीएची दारे खुली करण्याची घोषणा सरकारने केली आणि नेमक्या त्याच्या आदल्या वर्षीच जुईचा एनडीएतील शाळेत दहावीच्या पेपरचा नंबर आला. लहानपणापासून शिस्त आणि बुद्धिमत्तेवर धनुर्विद्या स्पर्धेसह शाळेत कायम ९० टक्के गुण मिळविणाऱ्या जुईला तेव्हापासूनच सैन्यदलाचे क्षेत्र खुणावत होते. ती अकरावीला गेल्यावर एनडीएतील मुलींना प्रवेशाची दारे उघडी झाली आणि मग जुईने एनडीएची तयारी सुरू केली.
वास्तविक, बारामती मधील ढगे कुटुंबीयांमध्ये आजपर्यंत सैन्यदलामध्ये कोणतेच नातेवाईक नाही. विद्या प्रतिष्ठान कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाचा अनुभव असलेल्या आई डॉ. मनीषा व चुलते श्रीकांत ढगे तर कमिन्समध्ये क्वालिटी ऑफिसर असलेले वडील राजेंद्र यांनी त्यासाठी दिलेला भक्कम पाठिंबा यामुळे जुईने हे यश तिसऱ्याच प्रयत्नात सहज मिळविले.
जुईचे आजोबा नरहरी ढगे शेती महामंडळ मधून निवृत्त झाल्यावर बारामती शहरात स्थायिक झाले मुलगा राजेंद्र पुण्यात नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना जुईचा जन्म व बालपण बारामती मध्ये गेले व प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये पोहणे, पळणे ,घोडे स्वार आदी ची सुरवात बारामती मधून केली त्यामुळे बारामती शी माझे नाते घट्ट असून या पुढे एन डी ए मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकास मोफत मार्गदर्शन करू असे जुई ने आवर्जून सांगितले.