
थेट WhatsApp वर मिळवा
बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रविवारी २७ सप्टेंबर रोजी बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. २४ सप्टेंबर : बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सर्व बँका उघड्या ठेवण्यास मंजुरी दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपाची हाक दिल्याने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय आणि आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
सलग सुट्ट्या आणि संपाची पार्श्वभूमी
अ आठवड्यात ५ दिवसांचे कामकाज यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक युनियनने संपाचा इशारा दिला आहे. शनिवारची सुट्टी आणि त्यापाठोपाठ तीन दिवसांचा संप यामुळे सलग पाच दिवस बँकिंग सेवा प्रभावित होण्याचा धोका निर्माण झाला होता. ३० सप्टेंबर रोजी बँकांचे अर्धवार्षिक क्लोजिंग असल्यामुळे व्यापारी व नागरिकांच्या व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
पूर्ण क्षमतेने सुरू राहणार कामकाज
नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी रविवारी सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या दिवशी बँकांच्या सर्व शाखा, एटीएम आणि करन्सी चेस्ट पूर्णवेळ कार्यरत राहतील, ज्यामुळे नागरिकांना आपली महत्त्वाची आर्थिक कामे वेळेत पूर्ण करता येतील.
