बाळशास्त्री जांभेकर यांचे कामकाज रवींद्र बेडकिहाळ यांनीच प्रकाशझोतात आणले : जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | मराठी पत्रकारितेचा पाया भक्कम करण्यात बाळशास्त्री जांभेकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग असे काम केले आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्वाचे काम समाजापुढे व प्रकाशझोतात आणण्याचे काम आपल्या फलटण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे. त्यांचे स्मारक त्यांच्या गावी उभारण्याचे काम त्यांनी केले. त्यांची स्मृती म्हणून तालुक्यात जांभेकर यांच्या नावाने मध्यामिक विद्यालय सूरु केले. जांभेकर यांच्या तोडीचे काम फलटण शहारासह तालुक्यात केले आहे. त्यांचे हे कार्य महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी पुढे नेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मुंबई, पोंभूर्ले या आणि फलटणचे स्मारक महाराष्ट्रासाठी प्रेरणा देणारे आहे; असे मत जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिनानिमित्त येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयामध्ये बाळशास्त्रींना अभिवादन, रांगोळी आणि चित्रकला प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकीय नेते, फलटण शहर व ग्रामीण भागातील पत्रकार आणि सामजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, प्रा.रमेश आढाव, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष सोनवलकर, सदस्य आनंद पवार, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य शांताराम आवटे, श्रीराम विद्याभवन शाला समितीचे चेअरमन रविंद्र बर्गे, जायंटस ग्रुप ऑफ फलटणचे अध्यक्ष दिपक दोशी, सेक्रेटरी पी. व्ही.भोसले, धनाजी जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, डॉ.मधुकर जाधव आदी मान्यवरांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विद्यालयाने आयोजित केलेले ग्रंथ प्रदर्शन, कला व रांगोळी प्रदर्शन हे निश्चित अभिनंदनीय आहे. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठरणारे आहे असे प्रा. रमेश आढाव यांनी सांगितले.

पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. तो अनेक प्रसंगावर मात करून समाजातील अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे दर्शन घडवत असतो. त्यांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व, विकास आणि पंथ घडत असतात असे सांगून पत्रकार दिनाच्या निमित्ताने सुभाषराव शिंदे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांना तालुक्यातील जनतेच्या आणि संथेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप आणि श्रीराम विद्याभवन मनीष निंबाळकर मुख्याध्यापक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!