स्थैर्य, पाटण, दि.९: सलग गेली महिनाभर परतीचा व अवकाळी पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने खरिपातील भात पिके जागीच उभी आहेत. सातत्याने पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान शेतकऱ्यांनी गृहीत धरले असले, तरी भात, ज्वारी व नाचणीचे काड शेतातच भिजत असल्याने पुढील सहा महिने जनावरांचा आधार असणारा या पिकांचा सुका चारा कुजल्याने गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
भात, नाचणी व खरीप ज्वारीचे पीक काढल्यानंतर शिल्लक राहिलेले काड डिसेंबरपासून जुलैपर्यंत शेतकरी जनावरांना सुका चारा म्हणून वापरतात. भात, नाचणी व ज्वारीचे काड सुकवून त्याच्या पेंड्या बांधून गंजीला रचून ठेवले जाते. भुईमुगाचे वेलही सुका चारा म्हणून वापरतात. बागायती पट्ट्यात हिरवा चारा 12 महिने उपलब्ध असतो. काही क्षेत्रात मका, गवत घास, बाजरी पेरून हिरवा चारा तयार करतात. मात्र, फक्त खरीप हंगामावर अवलंबून असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यानजीक भात, नाचणी, भुईमूग व खरीप ज्वारीचा सुका चारा वाळवून गंज लावल्या जातात. नोव्हेंबर किंवा डिसेंबरनंतर मॉन्सूनच्या पावसास सुरुवात होईपर्यंत गवत उपलब्ध होत नाही तोपर्यंत सात ते आठ महिने गंजीचा सुका चारा जनावरांना दिला जातो.
डोंगरी भागात गवताच्याही गंजी लावल्या जातात. मात्र, गेले महिनाभर सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी फक्त धान्य घरी आणण्यासाठी धडपडत आहे. पिकांचे काड पाऊस उघडीप घेत नसल्याने शेतातच भिजत आहे. आता ते कुजू लागले आहे. कुजलेले काड जनावरेही खात नाहीत. त्यामुळे शेतातच पेटवावे लागणार आहे. सात ते आठ महिने जनावरांना आधार असणारा चारा शेतातच भिजत असल्याने पुढील काळात शेतकऱ्यांना जनावरांसाठी आवश्यक असणाऱ्या सुका चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार असल्याने बळिराजा चिंतेत आहे.