बळीराजाने रब्बी हंगाम यशस्वी करण्याचा केला निर्धार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि. ७ : अतिवृष्टीने खरीपाचे मोठे नुकसान झाले, नुकसानीची पाहणी, भरपाईची मागणी, शासनाच्या घोषणा सर्व काही झाले मात्र प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या हातात शून्य पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर भूलथापांच्या मागे न लागता बळीराजाने रब्बी हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे, परमेश्‍वराने त्याला साथ करावी, त्याच्या कष्टाचे चीज होईल इतपत त्याला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नुकसान भरपाई नाही : आता रब्बीचा आधार


अतिवृष्टी, वादळ वारे, नदी नाले, ओढ्यांचे पूर यामध्ये फलटण तालुक्यात शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले, अनेकांच्या जमिनी पुरामुळे वाहुन गेल्या, काहींची राहती घरे, जनावरांचे गोठे पडले मात्र शासनाचे नियम, निकषानुसार पिकांचे 33 % पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्रत्येकी 2 हेक्टर क्षेत्र नुकसान भरपाई साठी पात्र ठरविण्यात आल्याने या तालुक्यात शेत जमिनी वाहुन जाणे, उभी पिके जमीनदोस्त झाल्याने, तयार झालेला कांदा जमिनीत सडून गेल्याने, राहती घरे, जनावरांच्या गोठ्याचे नुकसान याचा विचार झाला नाही, आणि प्रत्यक्षात नुकसान भरपाईचा एक रुपया अद्याप कोणाला मिळाला नसल्याने त्या भूल भुलैयात न गुंतता रब्बी हंगामासाठी बळीराजाने पुन्हा कंबर कसली आहे.

पदरात पाडून घेण्याची जिरायत पट्टयात सवय तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या जिरायत अथवा बागायत कोणत्याही क्षेत्रात वापसा नाही, त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तरीही शेतकरी राजा संधी मिळताच, औत चालतात याची खात्री होताच पेरणी करण्याच्या गडबडीत दिसून येत आहे, कारण आज वापसा नसला तरी जिरायती पट्ट्यात उद्या पुन्हा पाऊस होईल याची खात्री नाही, उपलब्ध पाणी पुरेसे ठरेल याचीही खात्री नाही. त्यामुळे आहे ते पदरात पाडून घेण्याची जणू सवयच विशेषतः जिरायत पट्ट्यात लागली आहे.

धनदांडगे व राजकिय वरदहस्त लाभलेल्यांचा रोग पाण्याला जडला


बागायत पट्ट्याला पाणी पुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत, त्यामुळे त्यांना चिंता नाही पण जिरायती पट्ट्यात आज पाटबंधारे तलाव, पाझर तलाव भरले आहेत, ओढ्या नाल्यांना प्रचंड पूर येऊन गेले असून सर्व ओढे नाले आज वहात आहेत, परंतू यापैकी अनेक तलाव जुने झाले असून वर्षानुवर्षे त्याच्या दुरुस्ती देखभालीचा कोणी फारसा विचार केला नाही, केला असला तरी तो फारसा गांभीर्याने कोणी घेतला नाही, त्यामुळे त्याच्या दुरुस्ती देखभालीची मागणी होताच संबंधीत यंत्रणा धावपळ करुन पाहणी करते, दुरुस्तीचे आराखडे, अंदाजपत्रक केले जातात पुढे निधी अभावी सारे ठप्प असल्याचे पहायला मिळते त्याचप्रमाणे जिरायती पट्ट्यात आणखी एक महाभयंकर रोग या पाणी प्रश्‍नाला जडला आहे, तो म्हणजे धनदांडगे आणि राजकीय वरदहस्त असलेले बलदंड शेतकरी. ही मंडळी सगळे नियम, निकष, कायदे, कानू धाब्यावर बसवून एक तर या तलावातच विहीर खोदतात आणि वीज मोटार लावून पाणी खेचून घेतात मग एक दोन तीन अमर्याद वीज मोटारी लावून तलाव कोरडा होईपर्यंत पाणी काढले जात असल्याने इतरांनी त्याकडे दुर्लक्ष करीत आपले पीक पाण्यावाचून वाया जाताना रहायचे अशी परिस्थिती असते, त्यामुळे सद्यस्थितीत वापसा नाही म्हणून थांबण्यापेक्षा जमेल तसे पदरात पाडून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे.

रब्बीच्या पेरण्या 34 टक्के पूर्ण


फलटण तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 400/450 मि. मी. इतकी अत्यल्प आहे, त्या पार्श्‍वभूमीवर आज पर्यंत सरासरी 618.78 मि. मी. पाऊस झाला आहे, जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव, पाटबंधारे तलाव, विहीरी तुडुंब भरल्या आहेत, सर्व ओढे, नाले अद्याप वहात आहेत, अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्यांसाठी वापसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, तालुक्यात लागवडीलायक क्षेत्र 88371 हेक्टर असून त्यापैकी 71135 हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून त्यामध्ये 47349 हेक्टर बागायती व 41030 हेक्टर क्षेत्र जिरायती आहे. त्यापैकी सुमारे 71 % म्हणजे 50017 हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून आज पर्यंत सुमारे 34 % क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला असून बळीराजा वापश्याच्या प्रतीक्षेत असल्याने उर्वरित रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत.

ऊस गेल्यानंतर गहू, हरभर्‍याचा पेरा


रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र 21093 हेक्टर असून त्यापैकी 9872 हेक्टर क्षेत्रावर, मकेचे सर्वसाधारण क्षेत्र 3016 हेक्टर असून त्यापैकी 987 हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र 21 हेक्टर असून त्यापेक्षा अधिक म्हणजे 31 हेक्टरवर कपाशीची लागण झाली असून हे पीक बोंड भरण्याच्या अवस्थेत आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र 5417 हेक्टर, हरभर्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र 1936 हेक्टर असून अद्याप गहू व हरभर्‍याच्या पेरणीला सुरुवात झाली नाही. प्रामुख्याने गळीतास गेलेल्या ऊसाच्या क्षेत्रात गहू व हरभर्‍याच्या पेरण्या होतात.

कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र 2220 हेक्टर असून त्यापैकी 67 हेक्टरवर टॉमेटोचे सर्वसाधारण क्षेत्र 452 हेक्टर असून त्यापैकी 28 हेक्टरवर टॉमेटोची लागण झाली आहे. ऊसाचे सर्वसाधारण क्षेत्र 16746 हेक्टर असून त्यापैकी अडसाली 8529 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी 5685 हेक्टर आणि पूर्वहंगामी 3961 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी 67 हेक्टरवर ऊसाच्या लागणी झाल्या आहेत. सुरु 1884 हेक्टर आणि खोडवा 2372 हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. गळीत हंगाम सुरु झाल्याने टप्प्या टप्प्याने तुटणार्‍या ऊसाचा खोडवा राखला जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!