
थेट WhatsApp वर मिळवा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत आता कागदपत्रे व मंजुरीसाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची कटकट संपली असून, सर्व प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०७ नोव्हेंबर : अनाथ आणि हलाखीच्या परिस्थितीत सापडलेल्या मुलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ राबवली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालकांना यापूर्वी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि स्थानिक बाल कल्याण समितीकडे प्रत्यक्ष कागदपत्रे घेऊन फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता शासनाने ही संपूर्ण प्रक्रिया ‘महाडीबीटी’ (MahaDBT) पोर्टलवर आणली आहे.
डिजिटल प्रक्रियेमुळे पालकांना मोठा दिलासा
नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे अर्ज करणे, कागदपत्रे जोडणे आणि मंजुरी मिळवणे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. अर्जाचे स्टेटस घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार असून, मंजूर झालेले प्रति बालक दरमहा अडीच हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे मध्यस्थांची कटकट थांबून वेळेची मोठी बचत होणार आहे.
महत्त्वाचे पात्रता निकष व कागदपत्रे
या योजनेचा लाभ शून्य ते अठरा वर्षांमधीस अनाथ, एका पालकाचे छत्र हरपलेली मुले, गंभीर आजारी किंवा कारागृहात असलेल्या पालकांची बालके घेऊ शकतात. अर्ज करताना बालकाचा वयाचा दाखला, मृत्यू किंवा आजारपणाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. पात्र पालकांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





