
बिबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्व महोत्सव उत्साहात; सोमीनाथ घोरपडे यांच्या प्रभावी व्याख्यानाने बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव.
स्थैर्य, बिबी, दि. 16 एप्रिल : विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मौजे बिबी येथे सिद्धार्थ तरुण मंडळ, भीमनगर यांच्या वतीने भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यान हे मुख्य आकर्षण ठरले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आपल्या व्याख्यानात सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा सखोल आढावा घेतला. बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून समाजाने कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जीवन विमा महामंडळ यांसारख्या संस्थांच्या उभारणीमागील बाबासाहेबांची दूरदृष्टी स्पष्ट केली. सार्वजनिक क्षेत्राचा विकास, खाणी व विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण यांसारख्या संकल्पनांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.
जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना केंद्रीय जल आयोग, दामोदर व हिराकूड प्रकल्प तसेच राष्ट्रीय विद्युत व्यवस्थेच्या संकल्पनेत बाबासाहेबांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. शेतकरी व कामगारांसाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याचा उल्लेख करत ८ तासांचा कामाचा दिवस, पगारी रजा, महागाई भत्ता यांसारख्या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला.
तसेच “जातपात तोडक मंडळ” प्रसंगाचा संदर्भ देत “Annihilation of Caste” या ग्रंथाच्या निर्मितीची पार्श्वभूमी त्यांनी उलगडली. माता रमाई यांच्या त्यागाचा विशेष उल्लेख करत महिलांनी रमाई, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बौद्ध उपासकांनी भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध यांच्यासह सम्राट अशोक यांचेही चित्र पूजास्थानी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
जयंती महोत्सवानिमित्त आयु. शशी जगताप यांनी स्व. विलास जगताप यांच्या स्मरणार्थ अन्नदान केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बिबी यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.
कार्यक्रमास बाळासाहेब काकडे, गणेश काकडे, राज काकडे, अविनाश काकडे, प्रदीप काकडे, दादा गायकवाड, सूरज सातपुते तसेच सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राज काकडे यांनी केले.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.
