दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । सातारा । पन्नास हजार रुपये येणे बाकी आहे, ते तू मला दे नाहीतर शेडखाली कर, अशी धमकी देऊन एकाला मारहाण केल्याप्रकरणी बाबर दांपत्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ फेब्रुवारी २०१९ ते मे २०२१ पर्यंत प्रशांत गोलाप्पा कोळी रा. आमनेवाडा पाठीमागे सदरबझार सातारा यांच्या घरी तेथेच राहणारे संजय बाबर अश्विनी संजय बाबर या दांम्पत्याने येऊन ५० हजार रुपये येणे बाकी आहे, ते तू मला दे नाही तर शेडखाली कर अशी धमकी दिली. अश्विनी बाबर यांनी त्याला हाताने मारहाण केली. संजय बाबर याने याचा २१ हजार ४९० रूपये किमतीचा मोबाईल व रोख ४ हजार ५०० रुपये घेऊन पैसे दे नाहीतर शेड मोकळे कर. शेड मोकळे केले नाहीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली.
सावकारी करण्याबाबत कोणताही परवाना नसतानाही या दांपत्याने २० टक्के दराने ९५ हजार रुपये व्याजाच्या स्वरूपात घेतले असून अद्यापही ५० हजार रुपये मुद्दल व व्याजाची रक्कम मागत आहेत, अशी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.