
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या पुढाकाराने ॲक्सिस बँकेच्या वतीने आरओ फिल्टर व कुलर बसवण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 21 एप्रिल : सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, विविध शासकीय आणि दैनंदिन कामकाजासाठी फलटण नगरपरिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन, लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या विशेष विनंतीवरून ॲक्सिस (Axis) बँकेच्या वतीने नगरपरिषदेत नवीन आरओ (RO) फिल्टर आणि स्वतंत्र पाण्याचा कुलर बसवण्यात आला आहे. या सुविधेमुळे या कडक उन्हाळ्यात नागरिकांना आता स्वच्छ आणि थंड पाणी मिळणार आहे.
“नगरपालिकेत नागरिकांचा विचार सर्वात आधी”:
या सुविधेचे लोकार्पण करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी ॲक्सिस बँकेचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, “फलटण शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक दररोज विविध कामांसाठी नगरपालिकेत येत असतात. यंदा उन्हाळ्याचा कडाका खूप जास्त आहे. पूर्वी सर्वसामान्य नागरिकांच्या अशा छोट्या पण महत्त्वाच्या गरजांचा कधीही विचार केला जात नव्हता. मात्र, आता ही नगरपालिका खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेचा आणि सोयीचा विचार सर्वात आधी केला जातो.”
सीएसआर (CSR) निधीतून आणखी कामे करण्याची विनंती:
यावेळी बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले की, “नागरिकांची तहान भागवण्यासाठी आणि त्यांना थंड पाणी मिळण्यासाठी ॲक्सिस बँकेने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.” तसेच, येणाऱ्या काळात नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्सिस बँकेने आपल्या सीएसआर निधीतून समाजासाठी उपयुक्त अशा आणखी काही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.
या आरओ फिल्टर आणि कुलरचे रीतसर उद्घाटन झाल्यानंतर, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी स्वतः त्यातून पाण्याचा ग्लास भरून पाणी पिले आणि उपस्थित नागरिकांनाही या थंड पाण्याचे वाटप केले.
या स्तुत्य उपक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखील जाधव, नगरसेवक राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, संदीप चोरमले, अमित भोईटे, रोहित नागटिळे, अशोकराव जाधव, नगरसेविका सौ. मीना काकडे, कु. सिद्धाली शहा यांच्यासह अनुप शहा, अमोल भोईटे, जितेंद्र (अप्पा) सरगर उपस्थित होते.
तसेच ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक विजय रणवरे, उपशाखाप्रमुख सौरभ प्रभुदेसाई आणि नगरपरिषदेचे इतर अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

