दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत डॉक्टर असोसिएशन क्रिकेट संघ अंतिम सामन्यात विजयी ठरला तर सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, साखरवाडीचा संघ उपविजेता ठरला. विजयी संघांना आमदार दीपक चव्हाण व निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या हस्ते चषकाचे वितरण करण्यात आले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी फलटण येथे शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येते. मुधोजी क्लबच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत डॉक्टरांच्या संघाने ग्रामीण पोलीस संघाचा व सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल संघाने पत्रकार संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, साखरवाडी व डॉक्टर असोसिएशन क्रिकेट संघ यांच्यातील अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डॉक्टरांच्या संघाने चार षटकात ६४ धावांचे लक्ष साखरवाडी संघासमोर ठेवले, यात डॉ. इम्रान शेख यांनी ३७ धावा केल्या. क्षेत्ररक्षण करताना पहिल्याच षटकात डॉ. अमर शेंडे यांनी साखरवाडी विद्यालयाचा आघाडीचा फलंदाज कुलदीप भगत यास धावचित करून संघाच्या विजयाचा पाय रचला. अखेरच्या षटकात साखरवाडी विद्यालयाच्या संघास विजयासाठी वीस तर अखेरच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. परंतु शेवटचा चेंडू निर्धाव गेल्याने डॉक्टरांचा संघ अंतिम विजेता ठरला. डॉ. इम्रान शेख हे अंतिम सामन्यांचे मेन ऑफ दि मॅच ठरले. विजयानंतर डॉक्टरांनी मोठा जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
या स्पर्धेतील डॉक्टर असोसिएशन, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, साखरवाडी, श्रीराम एज्युकेशन सोसायटी संघ ( तृतीय ), पत्रकार संघ ( चतुर्थ ) या विजेत्या संघांना आमदार दीपक चव्हाण व निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या हस्ते चषकाचे वितरण करण्यात आले. याव्यतिरिक्त मॅन ऑफ दि सिरीज डॉ. राकेश भागवत, बेस्ट बॉलर डॉ. महेंद्र ननावरे व सलग सहा षटकार मारल्याबद्दल कुलदीप भगत यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी भाऊ कापसे, सुनील मठपती, पंकज पवार आदींसह शहर व तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.