दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
मुंजवडी येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला करत तिला विषारी द्रव पाजण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती, सासू, सासरे व नणंद या चौघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद तेजस्विनी सूर्यकांत गुजले (रा. मुंजवडी, ता. फलटण) या पीडित महिलेने दिली आहे. या हल्ल्यात विवाहिता जखमी झाली आहे.
पती सूर्यकांत विलास गुजले, सासू राधाबाई विलास गुजले, सासरे विलास गुलाब गुजले (सर्व राहणार मुंजवडी, तालुका फलटण) व नणंद हिराबाई उर्फ साधना शिवाजी उर्फ लखन चव्हाण (राहणार चंद्रपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ऑक्टोबर २०२१ पासून ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत मुंजवडी, तालुका फलटण येथे वरील आरोपींनी मला लग्नामध्ये राहिलेले दहा तोळे सोने दिले नाही तसेच घरातील कामाचे व शेतामध्ये जाण्याचे कारणावरून सतत शारीरिक, मानसिक त्रास देऊन जाचहाट करून हाताने मारहाण केली आहे. तसेच दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास पती सूर्यकांत व सासरे विलास यांनी माझे दोन्ही हात पकडून मला खाली पाडले व सासू राधाबाई व नणंद हिराबाई उर्फ साधना यांनी माझे तोंड उघडून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व त्या झटापटीमध्ये गळ्यास व गालास ओरबडले आहे, अशी तक्रार विवाहितेने पोलिसात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील करत आहेत.