दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । सातारा । प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना साताऱ्यात आज सकाळीच थरारक चित्र पाहायला मिळालं. डीएमके जावली सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत एका महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळं काही वेळ खळबळ उडाली होती.
ज्योती नलावडे असं या महिलेचं नाव आहे. जावली सहकारी बँकेचं संचालक मंडळ व काही कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा तिचा आरोप आहे. ज्योती नलावडे यांनी या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केली होती. संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळं संतापलेल्या नलावडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज सकाळीच त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्या आणि स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळी त्यांना रोखल्यानं अनर्थ टळला.