दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पंरतु, केवळ सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दहशतीमुळे ते भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना चव्हाण यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. हा घोटाळा अद्याप बाहेर आलेला नाही. पंरतु, भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून चव्हाण यांच्याविरोधात तक्रार करून त्यांच्यामागे ईडीची ससेमिरा लावली जाऊ शकते. त्यामुळे आपला भ्रष्टाचार उघड होवू नये या भीतीपोटी चव्हाण भाजप मध्ये प्रवेश करतील, असा दावा पाटील यांनी केला.
चव्हाण यांनी भाजपमध्ये जावू नये यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांची मनधरणी केली. पंरतु, त्याचा काही एक फायदा झाल्याचे दिसून येत नाही. नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चव्हाणांनी भेट घेतल्याने त्यांचा भाजप प्रदेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे. पंरतु, केवळ सत्ता टिकवण्यासाठी भाजप चव्हाण यांचा वापर करून घेत असल्याचा दावा पाटील यांनी केला. शिंदे गटातील काही नाराज आमदार पुन्हा शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. अशात पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिंदे गटावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला आणखी स्थिर करण्यासाठी भाजप चव्हाणांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काँग्रेसमध्ये बंड घडवून आणत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
या सर्व खेळाची सुत्रे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती असल्याचा दावा देखील त्यांनी केला. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विखे पाटील चव्हाणांचे जवळचे मित्र आहेत. तेच चव्हाणांवर ईडीचा धाक दाखवून त्यांना भाजपमध्ये येण्यास बाध्य करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. भाजपमध्ये या अन्यता तुरूंगात जाण्यास तयार रहा, अशा शब्दात भीती दाखवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता असल्याने राज्यात आधिच मरनासन्न अवस्थेत असलेली काँग्रेस आणखी रसातळास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले.