
दैनिक स्थैर्य । 10 मे 2025। सातारा । राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यायचा आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे एका मुलाखतीत केले होते. त्या वक्तव्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सातार्यात सावध पवित्रा घेतला. शरद पवारांचे हे वक्तव्य कोणत्या संदर्भाने होते, हे आधी तपासावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीचा सत्ताधार्यांना पूर्ण पाठिंबा आहे. विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडीला पूर्ण भान आहे, असे त्यांनी सांगितले
कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे सातार्यात आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी काही वेळ पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात छेडले असता, त्या म्हणाल्या, केंद्र शासनाने इन्कम टॅक्स स्लॅबच्या संदर्भात नवीन विधेयक मांडले आहे. त्यासंदर्भात उच्चायुक्त समितीची दिल्ली येथे बैठक होती. त्या बैठकीनिमित्त मी दिवसभर दिल्ली येथे होते. ती बैठक आटोपून मी नुकतीच मुंबईवरून सातार्यात आले आहे. शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात जे वक्तव्य केले आहे, त्याबाबतची मला अजिबात कल्पना नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात जो निर्णय असेल, तो सर्वांशी चर्चा करूनच घेतला जाईल. एकीकरणासंदर्भातले शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचे संदर्भ तपासावे लागतील. त्यांनी ते वाक्य कोणत्या हेतूने उच्चारले, हे बघूनच त्याबाबत अधिकृत विधान करणे योग्य होईल, असे ते म्हणाल्या. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिल्ली येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांना देण्यात आली आहे. विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या जबाबदारीचे पूर्ण भान आहे. देशाच्या हितासाठी आम्ही विरोधी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष केंद्र शासनाच्या बरोबर ठामपणे आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.