दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्ह्यातील श्री खंडोबा देवस्थान पाल ता. कराड , श्री काळेश्वरी देवीची यात्रा, मांढरदेव ता. वाई, औंध ता. खटाव येथील श्री यमाई देवीची यात्रा तसेच यात्रा, सण व उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्थ्ोचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मुंबई पोलीस अधिनियम, 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात 19 जानेवारी 2022 च्या 24.00 पर्यंत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, काठ्यालाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिकरीतीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यताअगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी मनाईचे उल्लघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तू बरोबर घेवून जाईल किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ज्या लोकांना शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना हा आदेश लागू होणार नाही, असेही जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.