दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
राज्य परिवहन (एस.टी.) फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापकपदी वासंती जगदाळे यांची मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने निवड करण्यात आली. नुकताच जगदाळे मॅडम यांनी कार्यभार स्विकारला.
मुळच्या नवेखेड (इस्लामपूर) च्या रहिवासी असलेल्या जगदाळे यांनी सन २०१० मधे स्थानकप्रमुख म्हणून देवरूख आगारातून एस.टी.च्या सेवेस सुरुवात केली .नंतर त्यांनी सांगली, पलूस, तासगाव, इस्लामपूर आगारात स्थानकप्रमुख म्हणून उत्तम कामगिरी केली.
नुकत्याच झालेल्या आगार व्यवस्थापक बढती परिक्षेत त्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याने त्यांची फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे. आत्तापर्यतचा वाहतूक शाखेचा प्रदीर्घ अनुभव असल्याने बसेसच्या उपलब्धतेनुसार, प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करणार असल्याचे जगदाळे मॅडम यांनी सांगितले. फलटण आगारातील सर्व कर्मचारी-अधिकारी यांचा असलेला योग्य समन्वय आणखीन वृद्धिंगत करून फलटण तालुक्यातील प्रवाशी-विद्यार्थी-ज्येष्ठ नागरिक यानां वक्तशीर, जलद व सुरक्षित सेवा देण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहील, असे जगदाळे यांनी सांगितले.
नूतन आगार व्यवस्थापक जगदाळे मॅडम यांचे कष्टकरी जनसंघ फलटण आगार तसेच कामगार संघटनेच्या व प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.