दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी या योजनेचे अनुसूचित जाती, विजाभज ,इमाव व विमाप्र प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण (Renewal) अर्ज दि. 4 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदत आहे. तर नवीन अर्ज नोंदणीसाठी अर्ज दि. 9 जानेवारी 2022 पर्यंत अंतिम मुदत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
या योजनेसाठी महाडिबीटी पोर्टलवर दि. १४ डिसेंबर २०२१ पासून अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांना याबाबतच्या सुचना महाविद्यालयाच्या सूचना फलक, दर्शनी भागात लावाव्यात. अर्ज भरण्याच्या सुचना प्रत्येक वर्गात दररोज फिरविण्यात याव्यात, विदयार्थ्यांच्या व्हॉटसअप ग्रुप तयार करून त्यावर विदयार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना व शिक्षण फि व परीक्षा फि योजनेचे स्वरूप, मिळणारे लाभ,पात्रता इ. बाबत विस्तृतपणे महाविदयालयात प्रसिध्दी देण्यात यावी. विदयार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता महाविदयालयात विदयार्थ्यांना संगणक व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून द्यावा. जेणे करून विदयार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही. विहीत मुदतीत अर्ज न केल्यास व मागासवर्गीय पात्र विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास संबंधित कॉलेज/ महाविद्यालयांच्या प्राचार्य यांची सर्वस्वी जबाबदारी राहील याची नोंद घेण्यात यावी.