सुधाकर बोरगावकर स्मृतीकथासंग्रह पुरस्कारासाठी आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 16 डिसेंबर : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षापासून दिवंगत प्रसिद्ध साहित्यिक कथाकार सुधाकर यशवंत उर्फ सु. य. बोरगावकर यांच्या स्मरणार्थ नवोदित लेखकाच्या प्रथम प्रकाशित कथा संग्रहासाठी राज्यस्तरीय पुरस्कार योजना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी 2025 साला मध्ये प्रकाशित झालेले कथासंग्रह पाठवावेत असे आवाहन, संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक,संयोजक दिनकर झिंब्रे यांनी केले आहे.

कथाकार सुधाकर यशवंत बोरगावकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी सातारा येथे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्याचे हेतूने राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. कथाकार सु. य.बोरगावकर हे ख्यातनाम साहित्यिक कथाकार वामन होवाळ तसेच प्रसिद्ध साहित्यिक सरोजिनी बाबर यांचे अत्यंत जवळचे स्नेही होते. त्यांचे हुरडा व हिसका हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्याअनेक कथा, कविता प्रबुद्ध भारत नियतकालिक तसेच विविध मासिके व दैनिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांच्या नावाने देण्यात येणार्‍या संबोधी प्रतिष्ठानच्या या पुरस्कारासाठी नवोदित लेखकाचा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रसिद्ध होणारा पहिला कथासंग्रह विचारात घेतला जाईल . त्यासाठी लेखक अथवा प्रकाशकांनी आपल्या साहित्य कृतीच्या दोन प्रती 15 जानेवारी 2026 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

या पुरस्काराचे स्वरुप दहा हजार रुपये धनादेश, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्काराचे वितरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते कथाकार सुधाकर यांच्या स्मृतिदिनी विशेष समारंभात केले जाईल.जाणकार परीक्षकांच्या निवड समितीकडून सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाची निवड केली जाईल. तरी या पुरस्कारासाठी लेखकांनी आपले कथासंग्रह खालील पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे यांनी केले. कथा संग्रह पाठवण्यासाठी पत्ता : निमंत्रक, संयोजक, दिनकर झिंब्रे, मोबाईल नंबर 9881599991
हर्ष अ‍ॅडव्हरटायझर्स, छत्रपती शाहू स्टेडियम शॉप नंबर तीन, शक्ती स्पोर्ट्स जवळ, सातारा-415001

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!