
दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२६ | सातारा |
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर (वय २७, रा. फडतरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी मुंबईतील सायन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय व फिटनेस प्रमाणपत्रांसारख्या कामांसाठी राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या सहकार्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करून डॉ. रुपनवर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. काही महिन्यांपूर्वी याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनीही आत्महत्या केली होती.
गतवर्षी याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता डॉ. रुपनवर यांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी सायन रेल्वे स्थानक परिसरातील उच्चदाबाच्या टॉवरवर चढून डॉ. रुपनवर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. रुपनवर यांनी यापूर्वी काही गंभीर आरोप केले होते. शस्त्र परवान्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय ‘फिटनेस सर्टिफिकेट’ देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला आणि नकार दिल्यानंतर धमकी व धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरोधात फलटण पोलिसात तक्रार आणि गुन्हा दाखल केला होता. डॉ. रुपनवर यांनी एका माजी आरोग्य मंत्र्याचा पीए असलेला प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख व अन्य एकावर फलटण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोग्य उपसंचालक यांच्याविरोधातही तक्रार केली होती.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे डॉ. रुपनवर यांनी यापूर्वीही टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला होता. हातावर सुसाईड नोट लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातूनही व्यथा मांडली होती. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले होते; मात्र त्यानंतरही वाद कायम राहिला होता. त्यातूनच त्यांनी २९ ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर पोलिसांनीही समुपदेशन केले होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकार्यांच्या चौकशीची मागणीही केली होती.
वरिष्ठांच्या निर्देशानुसार या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने डॉ. रुपनवर यांचीही चौकशी केली. मात्र महिना उलटूनही अहवाल जाहीर झाला नसल्याचा आरोप करत त्यांनी पहिल्यांदा १८ ऑगस्ट रोजी पुन्हा आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी २७ रोजी मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना सायन येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, सोमवारी (दि. ३१) दुपारी २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी २९ जुलै रोजी राजीनामा दिला असून दि. ३० पासून ते कामावर आले नसल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
