
जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आनंदराव शितोळे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. रविवारी फलटणमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. २८ जून : तिरकवाडीचे सुपुत्र आणि जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव शितोळे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने तिरकवाडीसह पंचक्रोशीतील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
आनंदराव शितोळे यांनी जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून ज्ञानाचा दीप तेवत ठेवला. शिक्षणाचा प्रसार, समाजहिताची तळमळ आणि विद्यार्थ्यांविषयी असलेल्या प्रेमामुळे त्यांनी सर्वांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.
त्यांनी घालून दिलेला शिक्षणाचा आदर्श आणि समाजसेवेचा वारसा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या फलटण येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.