दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील १२६ गावांमध्ये १६१ रेशन धान्य दुकाने असून त्यामधील ३९१६८ पात्र लाभार्थी कुटुंबांना दि. १४ फेब्रुवारी २०२४ पासून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप सुरू झाले आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
या शिधा वाटपात एक लिटर तेल, एक किलो साखर, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो रवा व अर्धा किलो पोहे असे एकूण सहा जिन्नस एका विशिष्ट प्रकारच्या कॅरीबॅगमध्ये भरून लाभार्थ्यांना केवळ १००/- रूपयांत उपलब्ध करून दिले आहे.
यापूर्वी गौरी-गणपती आणि दिवाळी सणासाठी आनंदाचा शिधा फलटण तालुक्यातील अनुक्रमे ३९५३८ आणि ३९७४२ पात्र लाभार्थ्यांना मिळाला होता.
या शिधा वाटपाबाबत कोणत्याही लाभार्थ्यास तक्रार असल्यास त्यासाठी तहसील कार्यालय, फलटण येथे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, महसूल नायब तहसीलदार नामदेव काळे, पुरवठा निरीक्षक मनोज काकडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.