
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळीच्या तोंडावर अमूलने ग्राहकांना झटका देत तूप आणि बटरच्या दरांमध्ये ३ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत वाढ केली असून, नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ०५ नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, अमूलने आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
नवे दर आणि वाढीव किमती
अमूलच्या सुधारित दरानुसार, १ किलो तुपाच्या कार्टनची किंमत ६३० रुपयांवरून वाढवून ६८० रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति पॅक ५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तसेच ५०० ग्रॅम शुद्ध तुपाचे पाऊच ३२५ रुपयांऐवजी आता ३४५ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय, बटरच्या किमतीतही वाढ करण्यात आली असून १०० ग्रॅम बटरचा पॅक ६३ रुपयांऐवजी ६६ रुपयांना आणि ५०० ग्रॅम बटरचा पॅक ३१० रुपयांऐवजी ३२५ रुपयांना उपलब्ध होईल.
वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर ताण
बाजारपेठेत तुपाची वाढती मागणी आणि काही भागांत झालेली अन्न सुरक्षेची कारवाई यामुळे ब्रँडेड तुपाचा तुटवडा जाणवत आहे. सणासुदीच्या काळात गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी तूप व बटरची मागणी वाढल्याने पुरवठ्यावर मोठा ताण आला असून, याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे.





