आंबिया बहाराच्या फळपीक विम्यात सहभागी होण्याचे आवाहन; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहारासाठी शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

स्थैर्य, पुणे, दि. ०६ ऑक्टोबर : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२६-२७ अंतर्गत द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, डाळिंब यांसह विविध फळपिकांसाठी शेतकऱ्यांनी [https://www.pmfby.gov.in](https://www.pmfby.gov.in) या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

विविध पिकांसाठी अंतिम मुदतीची घोषणा

ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी लि. मुंबई यांच्यामार्फत राबवली जात आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपई, नारळ पिकासाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा व अंजीर पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर २०२६ आणि डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२७ ही अंतिम मुदत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. गारपीट हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता देऊन सहभाग घेता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

अटी व आवश्यक कागदपत्रे

योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे कमीत कमी २० गुंठे व जास्तीत जास्त ४ हेक्टर मर्यादा आहे. एका वर्षात एकाच क्षेत्रावर एकाच हंगामासाठी अर्ज करता येईल. फसवणूक करून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास पुढील ५ वर्षे योजनेतून बाद केले जाईल. अर्जासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी (फार्मर आयडी), डिजिटल पीक पाहणी नोंद, आधार कार्ड, बँक तपशील, ७/१२ उतारा, जिओ टॅगिंग फोटो व भाडेपट्ट्याने शेती असल्यास नोंदणीकृत करार आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी किंवा [https://krishi.maharashtra.gov.in](https://krishi.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!