आमदारकीसाठी धुमशान अंगात आलं;

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘Political ठसका’ हे खास सदर आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. निश्चितच आपल्याला हे आवडेल, यात शंका नाही….

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे, फलटण.

अटीतटीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. फलटण तालुक्यातील सर्वच नेतेमंडळींचे बंगले आता गावपुढाऱ्यांच्या घोळक्यांनी गजबजू लागले आहेत. खासदारकीनंतर आता पुढाऱ्यांच्या अंगात देखील आमदारकीचे धुमशान आले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

१९९५ ते २०२४ तीस वर्षे सत्तेची; श्रीमंत रामराजे यांच्या वरचष्म्याची

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा खरतर २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. पूर्वी फलटण तालुक्यातील पूर्व भागातील ३६ गावे ही माणला जोडलेली होती. तर फलटण आणि खंडाळा तालुक्यांचा एकत्रित असा फलटण-खंडाळा विधानसभा मतदार संघ होता. फलटण-खंडाळा विधानसभा मतदार संघातून १९९५ साली महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अपक्ष म्हणून निवडून आले. तदनंतर १९९९ आणि २००४ साली झालेल्या निवडणुकीत देखील श्रीमंत रामराजे यांनी या मतदारसंघावर आपली सत्ता ठेवली. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आला. पण तरीही पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे यांच्याच विचारांचा आमदार निवडून आला. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत आमदार दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यात आणि फलटण तालुक्यावर आपला वरचष्मा कायम ठेवण्यात श्रीमंत रामराजे यांना यश आले आहे.

कधी मनोमिलन तर कधी कट्टर विरोध; पण, यंदाची निवडणूक जानी दुष्मनीची

श्रीमंत रामराजे जेंव्हापासून फलटण तालुक्याच्या राजकारणात आले तेंव्हापासून फलटणच राजकारण हे सतत बदलत गेले. विरोधकांशी कधी मनोमिलन तर कधी कट्टर विरोध करत त्यांनी निवडणुकीत बाजी मारली. राज्यपातळीवर शरद पवारांसोबत राहून आणि तालुक्यात कधी विरोधकांसोबत तर कधी विरोधकांच्याविना राहून श्रीमंत रामराजे यांनी निवडणुका लढल्या आणि जिंकल्या देखील. यंदा मात्र राज्यातली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती ही विचित्र झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झालेले आहेत. दोघेही एकमेकाचे जानी दुष्मन झाले आहेत. सध्या श्रीमंत रामराजे हे अजित पवारांसोबत आहेत. पण, कार्यकर्ते मात्र शरद पवारांच्या तुतारी सोबत आहेत. परिणामी फलटण तालुक्याच्या राजकारणावर पडसाद उमटलेले दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून आपण हे विचित्र राजकारण प्रत्यक्ष अनुभवत आहोतच. त्यातच लोकसभा निवडणुकीत श्रीमंत रामराजे यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्याविरोधात काम केल्यामुळे कट्टर विरोधक असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आता ‘जानी दुष्मन’च्या भूमिकेत गेलेले आहेत. श्रीमंत रामराजे यांना लोकसभेला घ्याव्या लागलेल्या या भूमिकेमुळे फलटणचं राजकारण आता खुनशी भावनेकडे वाटचाल करताना दिसत आहे. अर्थात त्याचा खरा प्रत्यय या विधानसभा निवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांना येईल, असे म्हणतात.

(क्रमशः)

अस्तित्वाला धोका नाही पण, धक्का?


Back to top button
Don`t copy text!