दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | सातारा | मुस्लिमांसह सर्वच अल्पसंख्यांकांना राष्ट्राच्या राजकीय, संस्कृतिक क्षेत्रात सर्वसमावेशक समान प्रतिनिधित्व व नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार व राष्ट्राच्या ओळखीत स्थान मिळावे, असे मत संशोधक, अभ्यासक सरफराज अहमद यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने “भारताचा अमृत काल” या विषय सूत्रावर आयोजित केलेल्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत अल्पसंख्यांकांचे प्रश्न व भारताचे भवितव्य या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड. हौसराव धुमाळ, प्रा. प्रशांत साळवे, सामाजिक कार्यकर्ते मिनाज सय्यद, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सरफराज अहमद म्हणाले, मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठे विषयी अकारण शंका उपस्थित करून त्यांना अलग पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे योग्य नाही. देशात मुस्लिमांना ६ टक्के एवढेच अल्प राजकीय प्रतिनिधित्व मिळालेआहे. सुखाने जगण्याच्या अधिकारासाठी त्यांना योग्य वाटा मिळाला पाहिजे.मुस्लिम समाजाला बहुसंख्यांकां पुढे नमवण्याचा आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाज मेटाकुटीला आला आहे. त्यांना मूल्यप्रधान नागरिकत्व मिळाले पाहिजे. सध्या पॅलेस्टाईन मधील मुस्लिमांच्या शोषणाविरुद्ध फार बोलले जाते बोलले जाते. खरे तर इथल्या मुस्लिमांच्या शोषण व अन्याया विरुद्धही बोलण्याची गरज आहे.
शहरांच्या नामांतरा बाबत बोलताना ते म्हणाले, उस्मानाबादचे धाराशिव झाले करण्यात आले त्याला आमचा विरोध नाही, परंतु राष्ट्राच्या ओळखीत औरंगाबाद शहराचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. औरंगजेब आमचा कोणीच नव्हता. पण या शहराचे देशाशी असलेले नैसर्गिक नाते संपवले गेले याची खंत वाटते.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत साळवे यांनी आभार मानले.