अजित पवारांनी टाळलं देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच व्यासपीठावर येणे


स्थैर्य,बारामती, दि १४: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दीड वर्षापूर्वी पहाटेचा शपथविधी घेऊन राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला होता. पण, त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. पण, राज्यात कोरोनाची परिस्थितीत चिंताजनक होत असल्यामुळे अजित पवारांनी 50 पेक्षा जास्त लोकं असलेल्या कार्यक्रमास जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फडणवीस आणि अजितदादा आज पुण्यात  एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता मावळली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. अशातच अजित पवारांनीही याच धर्तीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

‘ज्या कार्यक्रमाला पन्नास पेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर त्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही’, असा निर्णय उपमुख्यम॔त्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आज अभिनेते प्रशांत दामले यांच्या कार्यक्रमास अजित पवार उपस्थित राहणार नाहीत.

आज पुण्यात 5,30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ चा 400 वा प्रयोग पुण्यात होणार आहे. या प्रयोगाला देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहे. तसंच अजित पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी 14 मार्चला प्रयोग झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाला होता. त्यामुळे सर्व प्रयोग बंद झाले होते. त्यानंतर आज वर्षभरानंतर 14 तारखेलाच या 400 वा प्रयोग ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रयोगाला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हजर राहणार आहे. पण, आता अजित पवार यांनी 50 पेक्षा जास्त लोकं हजर असलेल्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्यास नकार दिला आहे.

मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर अजित पवार यांनी सर्वच कार्यक्रमात कोरोनाची खबरदारी घेताना पाहण्यास मिळत आहे. त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे कळत आहे.


Back to top button
Don`t copy text!