‘अजिंक्यतारा’ शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द आ. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने लावलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानारूपी रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्‌या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जात आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या जेष्ठ सभासदांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून उत्साहात पार पडला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, सर्व संचालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा करत आहे. इतर कारखान्यांची परिस्थिती पाहता आपल्याच कारखान्याला ऊस घालण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे आणि ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आहे. यंदाच्या गळीत हंगामात ७ लाख ५० हजार मे. टन. एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट असून हा विक्रम आपला कारखाना निश्चितच करणार आहे. गाळपासाठी सगळी यंत्रणा सक्षम झाली असून हाही हंगाम यशस्वीपणे पार पडेल यात कोणतीही शंका नाही. \

कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्याबरोबरच टप्प्याटप्प्याने डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पांचेही विस्तारीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या कारखान्याच्या साखरेचा दर्जा चांगला असून कारखाना दरही उच्चतम देत आहे. या हंगामात ऊसदर देताना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या निर्णयाप्रमाणेच आपला कारखाना किफायतशीर देणार आहे. उच्चतम दर देण्याची परंपरा यंदाही कायम राहील. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंद केलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि नेहमीप्रमाणे हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. संचालक नामदेव सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, पंचायत समिती सभापती सौ. सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्य जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, धर्मराज घोरपडे, मिलिंद कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी सावंत, उपाध्यक्ष नारायण साळुंखे, दिलीप फडतरे, सुनिल काटे, गणपतराव शिंदे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, ऍड. सुर्यकांत धनावडे, उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, पंडितराव सावंत, गणपत मोहिते, प्रतापगड साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा पाटील, अरविंद चव्हाण, अजित साळुंखे, जेष्ठ संचालक लालासाहेब पवार, कामगार युनियचे अध्यक्ष कृष्णा धनवे, सरचिटणीस सयाजी कदम यांच्यासह अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व आजी माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बिगर सभासद आणि कामगार, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!