स्थैर्य, पुणे (प्रतिनिधी), दि.५ : कोरोनाला अटकाव
करण्यासाठी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतील विमान प्रवाशांना
आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. या चाचणीमध्ये पुण्यात आलेले २१
प्रवासी बाधित आढळून आले आहेत. चाचणी अहवाल नसलेल्या ५०७ प्रवाशांची
विमानतळावर चाचणी करण्यात आली होती.
दिवाळीच्या कालावधी देशभरातील
बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यानंतर कोरोनाबाधित
रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले. राज्य शासनाकडून दुस-या लाटेची
शक्यता गृहित धरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव
असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणा-या प्रवाशांची
तपासणी करण्याचा निर्णय घेतला. दि. २५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची
अंमलबजावणी सुरू झाली. विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. तर
रेल्वे प्रवाशांना लक्षणे दिसल्यास स्थानकावरच अँटीजेन चाचणी केली जात
आहे.
पुणे विमानतळावर दि. १ डिसेंबरपर्यंत
दिल्लीतून सर्वाधिक १२ हजारांहून अधिक प्रवासी पुण्यात आल. त्यापाठोपाठ
राजस्थान ९७२ व गुजरातमधील ५६० प्रवासी होती. या कालावधीत गोव्यातून एकही
विमान आले नाही.
विमानतळावर दाखल झालेल्या एकूण १३ हजार
७७२ प्रवाशांपैकी ५०७ प्रवाशांकडे आरपीसीआर चाचणीचा रिपोर्ट नव्हता.
त्यांची विमानतळावर चाचणी करण्यात आली. त्यापैकी २१ जणांना कोरोनाची लागण
झाल्याचे समोर आल्याची माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली. हे
प्रमाण जवळपास ४ टक्के एवढे आहे. चाचणी करतेवेळी यावेळी या प्रवाशांचा
संपर्क क्रमांक घेतला जातो. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व
पालिका प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही केली जाते.