नाना पाटील चौकात रस्तारोको करताना स्वाभिमानीचे पदाधिकारी |
स्थैर्य, फलटण, दि. ७ : केंद्र शासनाने आणलेली कृषी विधेयके रद्द करावीत या प्रमुख मागणीसह शेतकर्यांच्या अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रस्ता रोको आंदोलन केले पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून वाहतूक सुरळीत केली व त्यानंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलन कर्त्यांना सोडून देण्यात आले.
अ.भा. किसान संघर्ष समितीच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी व व्ही.एम.सिंग यांनी आज केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांबाबत देशभर आंदोलनाची हाक दिली होती त्याप्रमाणे देशभर विविध मार्गाने या कायद्या विरोधी आंदोलने छेडण्यात आली. किसान संघर्ष समितीच्या या मागणीला पाठींबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजचा रस्ता रोको केल्याची माहिती स्वाभिमानीचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिली. आंदोलनात तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, दादा जाधव, सुभाष जाधव, बाळासाहेब शिपकुले, विश्वनाथ यादव, पप्पू सत्रे, प्रल्हाद अहिवळे, पंकज आटपाडकर वगैरेंनी सहभाग घेतला होता.
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारची शेतकरी विरोधी विधेयके रद्द करावीत, अतिवृष्टी, वादळवारे पूर, यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीक वीमा कंपण्यांना 100 टक्के पीक विमा देण्याचे बंधन शासनाने घालावे, कापसाची हमी भावाने खरेदी तातडीने सुरु करावी आदी मागण्या करण्यात आल्या असून केंद्र व राज्य सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करीत जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकर्यांच्या तीव्र उद्रेकाला केंद्र व राज्य सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा धनंजय महामुलकर यांनी यावेळी दिला.