दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
महात्मा जोतिबा फुले यांचा वारसा डॉ. आंबेडकर व छ. शाहू महाराजांनी चालविला. बुद्धानंतर महात्मा जोतिबा फुले यांनीच खर्या अर्थाने विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. ती शिकवण आत्मसात करणे हे देशहिताचे आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद फरांदे यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील सांस्कृतिक सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा ‘महात्मा जोतिबा फुले आणि सत्याचे समग्र विचार’ या विषयावर डॉ. फरांदे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना चंद्रकांत खंडाईत यांनी समितीबाबत भाष्य केले. येणार्या वर्षभरात सर्व समाज घटकांना घेऊन समाजप्रबोधनपर कार्यक्रम हाती घेण्यात येतील. म.फुलेंच्या जीवन कार्यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.
प्रारंभी डॉ.आंबेडकर पुतळ्यास शोभा भंडारे व कु. मेघा खंडाईत (गुडी) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. म. फुले यांच्या प्रतिमेस प्रमोद फरांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समता सैनिकांनी मानवंदना दिली.
म.फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण सचिव दिलीप एकनाथ फणसे यांच्याकडून समता सैनिक यांना ड्रेस कोड किटचे वाटप करण्यात आले. बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते व प्रमोद फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास तोडकर, शाहीर यशवंतराव भाले, किशोर गायकवाड, दिलीप सावंत, सौ. कल्पना कांबळे, द्राक्षा खंडकर व शोभा भंडारे आदींना किटचे वाटप करण्यात आले.
कार्याध्यक्ष अरुण पोळ, सरचिटणीस संदीप कांबळे, सचिव रमेश इंजे व अॅड. विलास वहागावकर यांनी स्वागत केले. अरुण जावळे व जीवन मोहिते यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जीवन मोहिते यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाणे यांनी आभार मानले.
सदरच्या कार्यक्रमास संयुक्त जयंती महोत्सव समितीसह तत्सम संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.