दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२४ | फलटण |
कुमठे, ता. कोरेगाव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कुमठे या शाळेच्या १९८५ च्या बॅचचे विद्यार्थी शाळेत पुन्हा त्याच आठवणींमध्ये रमले.
जवळपास अगदी आठच दिवसात ‘गेट टुगेदर’चे नियोजन करण्यात आले होते. खरं तर व्हाटस्अॅप ग्रुपमुळे सगळ्यांनाच एकमेकांना भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मुलींचा ग्रुप तयार होऊन चार-पाच वर्षे झाली, तरीही गेट टुगेदर करण्यात आले नव्हते. पण, अलीकडच्या काही दिवसांत मुलामुलींचा एकत्र ग्रुप तयार करण्यात आला. शाळेविषयी प्रत्येकाने आपापले मत मांडले. प्रत्येकालाच दहावीनंतरच्या आयुष्यात संघर्ष करावा लागला असल्याचे जाणवले. तरीही प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला उच्च शिक्षण दिले आहे, हे ऐकून खूप समाधान वाटले.
कार्यक्रमासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप सहकार्य केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली, तसेच स्वागत गीत गायले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमठे येथे स्थायिक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी मुंबई, कोल्हापूर, पुणे, सातारा तसेच कुमठे, भोसे, चंचळी येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
यावेळी शाळेसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून २५ हजार रोख रक्कम मुख्याध्यापक यांच्याकडे देण्यात आली. त्याचबरोबर वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पीएसआयपदी पदोन्नती झाल्याबद्दल रामदास इंगवले, हायकोर्ट वकील जगन्नाथ पवार, पत्रकारितेत कार्य केल्याबद्दल उमा रुद्रभटे यांचा यावेळी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले.