दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२४ | फलटण |
स्व. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दुधेबावी, ता. फलटण येथे दि. २० मार्च २०२४ रोजी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निलेश सोनवलकर यांनी दिली.
या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मारोतराव वाघमोडे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्षपदी कृषीशास्रज्ञ शिवाजीराव ठोंबरे राहणार आहेत. संमेलन अध्यक्षपदी ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे राहणार आहेत. यावेळी परिसवांद होणार असून त्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके भूषविणार आहेत.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, प्रियदर्शनी कोकरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या साहित्य संमेलनात कवी संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी रघुराज मेटकरी राहणार असून यावेळी विविध कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
साहित्य संमेलन दुधेबावीमधील दडस वस्ती येथील डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे साहित्य नगरी येथे होणार आहे.
या साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रासह साहित्यप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. संतोष कराडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिन लोखंडे ९६५३२०९५१७ यांच्याशी संपर्क साधावा.